By : अरविंद खोब्रागडे
*चंद्रपूर* : गावाखेड्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतुन शहरातील शैक्षणिक वातावरणात स्वतःच्या आयुष्याला नवा आयाम देऊ पाहणाऱ्या मागास मुलांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचा आजच्या पिढीला अनुभव घ्यायचा असेल तर जयंती -2 बघा…
जयंती -2 सोमवारी बघितला आणि आजच्या तरुणाईने त्यातही विशेषतः इतर मागास समाजातील, अनुसूचित जमाती मधील मुलांनी हा चित्रपट आवर्जून बघावा. इतका सुंदर विषय अतिशय सुरेख पद्धतीने मांडला आहे.आरक्षण हा विषय गेल्या 12 वर्षात तीव्रतेने चर्चेत आहे. आरक्षण हा शब्द केवळ अनुसूचित जाती, त्यातही केवळ बौध्द यांचेसाठी पर्यायी शब्द असल्यागत वापरला जातो. पण हा शब्द संपूर्ण OBC, ST यांचेसाठी किती महत्वपूर्ण आहे हे आजच्या पिढीला समजण्यासाठी पायल मडकाम या पात्राची जाणीव व्हावी लागेल.
पायल चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातुन मोठ्ठया शहरात शिक्षणासाठी जाते, त्या शैक्षणिक संस्थेत उच्चभ्रू समजणारे विद्यार्थी तिला कसा त्रास देतात, प्राध्यापक कसे जातीयवाद करतात, संस्कारचा टेम्भा मिरवणारे राजकारणी कसा मुलांचा मेंदू नासवतात, शेवटी त्या पायलला आपले गाव गाठावे लागते… संपूर्ण कथा आपलीशी करते…
या मुलीच्या न्यायसाठी पुढे येणारे आणि आरक्षण, जात हा विषय प्रभावीपणे मांडणारे तरुण असा एक धगधगता विषय घेऊन त्यावर उत्कृष्ट सिनेमा तयार करणे… हे अतिशय धाडसी पाऊल आहे… जयंती -2 च्या टीमने ते धैर्य दाखवले आणि सर्व सामर्थ्यानिशी त्यामध्ये प्राण ओतले आणि ते यशस्वी झाले. त्यांनी घेतलेल्या कष्टाची प्रचिती सिनेमा बघताना पदोपदी जाणवते. हा सिनेमा म्हणजे वर्तमानातील तरुण पिढीला दिशादर्शक असा दीपस्तंभ आहे. हजारो सिनेमांच्या यादीत सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या उत्कृष्ट कलाकृतींमध्ये जयंती -2 ने आपले नाव कोरलेले आहे. आज धार्मिक कट्टरता, जातीयवाद आणि सामाजिक भेदभाव पुन्हा आपले डोके वर काढत असताना तरुण पिढीला जागृत करण्याचे या सिनेमाच्या माध्यमातून केलेले कार्य अतिशय प्रशंसनीय आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बाबासाहेबांची सर्व समावेशक दृष्टी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत…. सिनेमा हे समाज मनावर दीर्घकाळ प्रभाव करणारे माध्यम आहे. त्या माध्यमाचा समाजाचे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी केलेला प्रभावी वापर नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेला आहे… यात तीळ मात्र शंका नाही… सिनेमातील सर्व पात्रांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेले आहेत.
मित्रांनो, चित्रपटातील संगीत खूप छान आहे… आपल्या मुलांसह हा चित्रपट नक्कीच बघा…
*अरविंद खोब्रागडे*
9850676782







