Home Chandrapur आया है मुझे फिर याद वो जालीम, गुजरा जमाना बचपन का!

आया है मुझे फिर याद वो जालीम, गुजरा जमाना बचपन का!

2

“२५ वर्षांनंतर अंताक्षरीत सहभागी होताच कॉलेजच्या आठवणींना उजाळा!”

विशाल जुमडे यांचा अनुभव; ‘जय माता दी’ दुर्गोत्सवातील अनोख्या उपक्रमाने जिंकली मने

मोबाईलच्या युगात जुन्या गाण्यांची मैफल ठरली संस्मरणीय; २० वर्षांपासून धार्मिक उत्सवासोबत सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांची परंपरा

विशेष वृत्त : राजेंद्र मर्दाने | ओशनिक न्यूज

वरोरा : “ आया है मुझे फिर याद वो जालीम,गुज़रा ज़माना बचपन का…” ह्या ‘देवर’ या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी तब्बल २५ वर्षांनंतर आपोआप ओठांवर आल्याने अंताक्षरी स्पर्धेत सहभागी झाल्याचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. शाळा, कॉलेजच्या दिवसांतील आठवणी, मित्रांसोबतचे आनंदाचे क्षण आणि जुन्या गाण्यांशी जुळलेले भावविश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळाल्याने आनंदाला पारावर उरला नाही, असे दिलखुलास मत प्रतिभाशाली सामाजिक कार्यकर्ते विशाल जुमळे यांनी व्यक्त केले. निमित्त ठरले मालवीय वॉर्डातील ‘जय माता दी दुर्गा उत्सव मंडळा’तर्फे आयोजित अंताक्षरी स्पर्धेचे!
अंताक्षरी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतरचा आपला अनुभव सांगताना विशाल जुमडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मित्राच्या आग्रहाखातर या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले आणि मनात जुन्या दिवसांची उजळणी सुरू झाली. साधारण ४८ वर्षांचे वय, आयुष्यातील वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात मागे पडलेल्या अनेक आवडीनिवडी. यामुळे इतक्या वर्षांनंतर अंताक्षरी खेळण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र, मित्राचा आग्रह आणि गाण्यांची आवड यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
आजच्या नव्या जमान्यातील गाणी आठवतील का? स्पर्धेचे स्वरूप कसे असेल? आपल्याला गाणी म्हणता येतील का? अशा अनेक प्रश्नांची मनात चलबिचल सुरू होती. त्याचवेळी तब्बल अडीच दशकांनंतर पुन्हा एकदा अंताक्षरी खेळण्याची उत्सुकताही मनाला आनंद देत होती, असे त्यांनी नमूद केले. विशाल जुमडे आणि त्यांचे मित्र शरद नन्नावरे जेव्हा स्पर्धास्थळी पोहोचले तेव्हा तेथील वातावरण पाहून त्यांचा उत्साह बळावला. बालकांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनींपर्यंत आणि गृहिणींपासून विविध क्षेत्रात कार्यरत महिलांपर्यंत अनेक जण उत्साहाने सहभागी झाले होते. पाहता पाहता रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली आणि जुन्या – नव्या हिंदी गाण्यांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.

‘दिवाने, परवाने आणि मस्ताने’ रंगले गाण्यांच्या मैफलीत!

अंताक्षरीचा खेळ सुरू होताच वातावरणात उत्साह संचारला. ‘दिवाने’, ‘परवाने’ आणि ‘मस्ताने’ अशा तीन गटांत प्रत्येकी दोन स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा विविध फेऱ्यांमधून रंगलेल्या या स्पर्धेत गाण्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली.
कधी एखाद्या गाण्याचा मुखडा आठवायचा, तर कधी त्याचा पुढचा अंतरा आठवण्यासाठी मन भूतकाळात धाव घ्यायचे. एखाद्या गाण्याचे बोल आठवताच चेहऱ्यावर आनंद खुलायचा, तर दुसरे गाणे आठवण्याच्या प्रयत्नात जुन्या आठवणींचे कप्पे उघडले जायचे. स्पर्धा केवळ गाणी म्हणण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती बुद्धीमत्तेला चालना देणारी, जुन्या आठवणींना उजाळा देणारी एक आनंदयात्रा ठरली.
सामान्य अंताक्षरीसोबतच मुखडा – अंतरा, नायक-नायिकांवर आधारित गाणी तसेच गाण्यांच्या शब्दांवरून गाणी ओळखण्यासारख्या वेगवेगळ्या प्रकारांनी स्पर्धेत रंगत आणली. विशेष म्हणजे, जुन्या हिंदी चित्रपटांतील विस्मृतीत गेलेली अनेक गाणी पुन्हा ओठांवर आली. एरवी दैनंदिन धावपळीत विसरून गेलेल्या या सुरांनी मनाला एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले.

पहिल्याच गाण्याने जाग्या झाल्या जुन्या आठवणी!

जुमडे म्हणाले की, स्पर्धेत सहभागी होताना सुरुवातीला प्रत्येकाच्या मनात थोडी धाकधूक होती. मात्र, पहिले गाणे म्हणताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जणू काही काळाचे चक्र उलटे फिरले आणि पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसांत पोहोचल्याची भावना निर्माण झाली.
२० – २५ वर्षांपूर्वीचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, गाण्यांची आवड आणि त्या काळातील उत्स्फूर्त आनंद या सगळ्या आठवणी एकामागून एक जाग्या होत गेल्या. इतर सहभागींचा उत्साह पाहून स्वतःचाही हुरूप वाढला. एखादे गाणे अचूक आठवले की चेहऱ्यावर समाधान, तर काही गाण्याचे शब्द आठवताना झालेली तारांबळही तितकीच आनंददायी!
विशाल जुमडे यांच्या मते, “अंताक्षरी स्पर्धेत सहभागी होण्याचा हा अनुभव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो जुन्या दिवसांशी पुन्हा नाते जोडणारा ठरला.”

मोबाईलच्या युगात अंताक्षरीची मैफल ठरली संस्मरणीय !

आजच्या काळात अंताक्षरीसारख्या स्पर्धा अपवादानेच पाहायला मिळतात. पूर्वी दूरचित्रवाणीवरील अंताक्षरीचे कार्यक्रमही लोकप्रिय व्हायचे . मात्र, बदलत्या मनोरंजनाच्या साधनांमुळे अशा कार्यक्रमांची लोकप्रियता काहीशी कमी झाल्याचे जाणवते.
मोबाईल, सोशल मीडिया आणि रील्सच्या जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनमध्ये गुंतलेला दिसतो. अशा वातावरणात प्रत्यक्ष एकत्र येऊन गाणी म्हणणे, आठवणी जागवणे आणि मनमोकळा आनंद लुटणे, ही अनुभवण्यासारखी बाब आहे.
अंताक्षरी स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जुन्या गाण्यांची जादू आजही कायम असल्याची प्रचिती आली. काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली; मात्र संगीताची आवड आणि जुन्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.

केवळ गरबा-दांडिया नव्हे; संस्कृती, मनोरंजन आणि प्रबोधनाचाही जागर!

आज अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव म्हटले की गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते. मात्र, मालवीय वॉर्डातील ‘जय माता दी दुर्गा उत्सव मंडळा’ने गेल्या २० वर्षांपासून नवरात्रोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांची जोड दिली आहे.
दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी दिली जाते.
बालकांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व इतर उपक्रम, नाटक, नृत्य, भजन, कीर्तन, आनंद मेळावा आणि ज्ञान-मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
देवीची भक्ती, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सहभाग यांचा सुंदर संगम घडविण्याचा मंडळाचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा मनोरंजन नव्हे, तर समाजातील विविध वयोगटांतील लोकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे प्रभावी माध्यम असू शकते, याची प्रचिती या उपक्रमातून येते.

निवेदनातून रंगली गाण्यांची मैफल!

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मर्दाने यांनी केले. स्पर्धक एखाद्या गाण्याचे बोल विसरले किंवा गाण्यात काही चूक झाली, तर संबंधित गाण्याचे योग्य बोल आठवून देत स्पर्धेची रंगत कायम ठेवण्यात आली. जुन्या गाण्यांची जाण आणि निवेदनातील उत्स्फूर्ततेमुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही या मैफलीचा मनस्वी आनंद घेता आला.
स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून अंताक्षरीसारखे उपक्रम आजही लोकांना आकर्षित करू शकतात, हे स्पष्ट झाले. अशा कार्यक्रमांमुळे मनोरंजनासोबतच जुन्या संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासही मदत होते.

अंताक्षरी संपली; पण आठवणींची मैफल मनात सुरूच!

विशाल जुमडे यांच्यासाठी ‘जय माता दी दुर्गा उत्सव मंडळा’ने आयोजित केलेल्या या अंताक्षरी स्पर्धेत सहभागी होणे हा केवळ एक स्पर्धेचा अनुभव नव्हता, तर स्वतःच्या भूतकाळाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा आनंददायी क्षण होता. मित्राच्या आग्रहामुळे घेतलेला सहभाग संस्मरणीय ठरला. त्यातून जुन्या गाण्यांचे महत्त्व, एकत्र येऊन आनंद लुटण्याची मजा आणि बालपणीच्या तसेच कॉलेजच्या दिवसांतील आठवणींचे मोल पुन्हा एकदा जाणवले.
विशेष म्हणजे, अंताक्षरीसारखा साधा वाटणारा खेळ वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींना एकाच धाग्यात बांधू शकतो, गाण्यांच्या माध्यमातून पिढ्यांमधील अंतर कमी करू शकतो आणि मोबाईलच्या आभासी जगापलीकडे प्रत्यक्ष संवादाचा आनंद देऊ शकतो, हे या स्पर्धेने दाखवून दिले.
‘जय माता दी दुर्गा उत्सव मंडळा’ने आयोजित केलेल्या या सुंदर उपक्रमामुळे एका स्पर्धकाला २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या करता आल्या, तर उपस्थितांना जुन्या गाण्यांच्या सुरेल मैफलीचा आनंद लुटता आला. यासाठी मंडळाचे पदाधिकारी सदस्य, वरोरा न.प.चे सभापती राहुल देवडे व टीम कौतुकास पात्र आहे.
अखेर, या अविस्मरणीय अनुभवाचे वर्णन करताना विशाल जुमडे आणि अन्य स्पर्धक यांच्या मनातील भावना खालील गीताच्या ओळींतून व्यक्त होतात –
“आया है मुझे फिर याद वो जालीम, गुज़रा ज़माना बचपन का…”

स्पर्धा संपली, गाणी थांबली; पण मनात सुरू झालेली आठवणींची अंताक्षरी मात्र अजूनही सुरूच आहे!