Home Chandrapur कोजागिरीच्या नावाखाली दुधाची लूट?

कोजागिरीच्या नावाखाली दुधाची लूट?

2

 

वरोऱ्यात दुधाचा दर थेट १५० रुपये लिटर; आनंदवन चौकातील प्रकाराने ग्राहक संतप्त!

सणासुदीच्या काळात ग्राहकांची आर्थिक कोंडी; दूध विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी

By – राजेंद्र मर्दाने 

वरोरा : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत दुधाची चढ्या दराने विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे. साधारणतः ७० ते ८० रुपये प्रतिलिटर दराने मिळणाऱ्या दुधासाठी आनंदवन चौक परिसरात थेट १५० रुपये प्रतिलिटर दर आकारला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सणाच्या नावाखाली होणाऱ्या या कथित दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सणाचा आनंद की ग्राहकांची आर्थिक पिळवणूक?

कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून त्याचे सेवन करण्याची परंपरा असल्याने या दिवशी दुधाला विशेष मागणी असते. याच वाढत्या मागणीचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून दुधाचे दर अव्वाच्या सव्वा वाढविले जात असल्याची तक्रार आहे. सणानिमित्त दुधाच्या दरात पाच-दहा रुपयांची वाढ ग्राहक समजून घेऊ शकतात; मात्र नेहमीच्या दराच्या जवळपास दुप्पट दराने दूध विकले जात असेल, तर हा प्रकार ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा ठरतो.
विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अशा दरवाढीचा आर्थिक फटका बसत आहे. सणाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दुधासाठी अधिक पैसे मोजण्याची वेळ ग्राहकांवर येत असल्याने नाराजी वाढत आहे.
मनमानी दरवाढीवर नियंत्रण कोणाचे?

सण, उत्सव किंवा विशेष प्रसंगांच्या वेळी एखाद्या वस्तूची मागणी वाढणे स्वाभाविक आहे. मात्र, या परिस्थितीचा फायदा घेत ग्राहकांकडून मनमानी दर आकारले जात असल्यास त्याची दखल घेणे आवश्यक आहे. दुधाचे दर कोणत्या कारणाने वाढविण्यात आले, विक्रीचा दर कशाच्या आधारे निश्चित करण्यात आला आणि ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या किमती योग्य आहेत का, याची तपासणी होण्याची गरज आहे.
प्रशासनाने तातडीने तपासणी करावी

आनंदवन चौक परिसरासह वरोरा शहरातील दूध विक्री केंद्रांची तपासणी करून प्रत्यक्ष विक्रीदरांची पडताळणी करावी. संबंधित विक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दरांची चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सणाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.