” ओशनिक न्यूज – इतिहासाच्या मुळापासून वर्तमानाच्या प्रश्नांपर्यंत आणि भविष्याच्या वेधाकडे “
“वरोऱ्याच्या इतिहासातील विस्मृतीत गेलेली पाने शोधतांना,आजच्या प्रश्नांचा मागोवा घेत आणि उद्याच्या वरोऱ्याचे स्वप्न पाहत –‘ ओशनिक न्यूज’ चा हा पहिला प्रयत्न .”
—————————————————-
वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाची दीड शतकाकडे वाटचाल!
भाग – १
राजेंद्र मर्दाने
वरोरा : ऐतिहासिक वारसा, औद्योगिक महत्त्व, कोळसा खाणी, शैक्षणिक केंद्र,व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने एकेकाळी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वरोरा शहराचा रेल्वे इतिहास आता जवळपास दीडशे वर्षांचा टप्पा गाठतोय. मात्र, ज्या शहराच्या विकासात रेल्वेने ऐतिहासिक भूमिका बजावली, त्याच वरोरा शहराला आजही अपेक्षित आणि अत्यावश्यक रेल्वे सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वरोरा नगर परिषदेची स्थापना १७ मे १८६७ रोजी झाली. त्यानंतर काही वर्षांतच वरोरा परिसर रेल्वेच्या नकाशावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे १८६७ मध्ये नगर परिषदेची स्थापना आणि त्यानंतरच्या दशकात रेल्वेचा झालेला विकास हा पुरेसा बोलका आहे. कापूस, कोळसा आणि व्यापारासाठी रेल्वेचा झालेला विस्तार,याबाबत ब्रिटिशकालीन Bombay Administration Report 1876-77 मध्ये Wardha Valley रेल्वेचा उल्लेख आढळतो. जून १८७७ च्या सुमारास हिंगणघाटपर्यंत आणि सन १८७८ च्या सुरुवातीस वरोऱ्यापर्यंत रेल्वे सुरू होण्याची शक्यता असल्याचे तत्कालीन प्रशासनाने नमूद केले होते. वर्धा–हिंगणघाट–वरोरा या रेल्वे सुरू करण्यामागे केवळ प्रवासी वाहतुकीचा उद्देश नव्हता तर हिंगणघाटच्या कापूस व्यापाराला आणि वरोरा परिसरातील कोळशाच्या दळणवळणाला चालना देणे,हेही त्यामागील प्रमुख कारण होते.
नंतरच्या रेल्वे इतिहासाच्या नोंदीनुसार वर्धा – वरोरा राज्य रेल्वे चा सुमारे ४५ मैलांचा मार्ग फेब्रुवारी १८७९ मध्ये पूर्ण झाला. त्या अगोदर पाण्याची सोय म्हणून १८७७ मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात ६१,६५० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यामुळे वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाची मुळे १८७७-७९ या कालखंडात स्पष्टपणे दिसून येतात.
वरोरा होते रेल्वेचे टर्मिनस!
आजच्या पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल; परंतु वरोरा हे एकेकाळी रेल्वेचे टर्मिनस होते. म्हणजेच वर्ध्याकडून येणाऱ्या रेल्वेचा प्रवास वरोऱ्यात संपत असे.
नंतरच्या ब्रिटिशकालीन Imperial Gazetteer मध्येही वरोरा हे Wardha–Warora branch of the Great Indian Peninsula Railway चे terminus असल्याची स्पष्ट नोंद आढळते. वरोऱ्याचे टर्मिनसचे स्थान त्याच्या व्यापारी आणि औद्योगिक महत्त्वाचे द्योतक होते. वरोरा परिसरातील कोळसा, चांदा जिल्ह्यातील व्यापार आणि विविध मालाची वाहतूक यामुळे वरोरा रेल्वे स्थानकाला त्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.वरोऱ्यापासून पुढे चांदा – बल्लारशाहकडे रेल्वे मार्ग
पुढे सरकला आणि रेल्वेचा विस्तार वरोऱ्यापासून पुढे चांदा अर्थात आजच्या चंद्रपूरच्या दिशेने करण्यात आला. त्यानंतर रेल्वे बल्लारशाहपर्यंत पोहोचली.उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार १९०४ च्या सुमारास वरोरा – चांदा पुढील रेल्वे विस्ताराचे काम सुरू झाले, तर १९०८ मध्ये रेल्वे बल्लारशाहपर्यंत पोहोचली.त्यामुळे वरोऱ्याची अनेक वर्षांची टर्मिनस म्हणून असलेली ओळख पुसल्या गेली आणि ते मुख्य मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन मात्र बनले.

दीडशे वर्षांचा इतिहास; पण आज रेल्वे सुविधांची कमतरता
वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाचा विचार केला तर आजची परिस्थिती काहीशी विरोधाभासी वाटते.
एकेकाळी वर्धा–वरोरा रेल्वेचा अंतिम टप्पा आणि टर्मिनस असलेल्या शहरात आज मोजक्या गाड्यांवर नागरिकांना समाधान मानावे लागत आहे. सध्या दररोज केवळ काही एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांची सुविधा उपलब्ध असून, साप्ताहिक गाड्यांची संख्याही मर्यादित आहे. कोरोनानंतर काही रेल्वेसेवा पूर्ववत झाल्या नाहीत, तर काही गाड्यांचे थांबेही बंद अथवा कमी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे इतिहास मोठा आणि वर्तमान रेल्वे सुविधा मात्र मर्यादित, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रेल्वे थांब्यांसाठी मागील अनेक वर्षापासून संघर्ष
वरोरा रेल्वे स्थानकावर विविध महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, बंद झालेल्या सुविधा पूर्ववत व्हाव्यात आणि प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक रेल्वेसेवा वाढवाव्यात, यासाठी मागील काही वर्षांपासून वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ, नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. हा संघर्ष केवळ काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यापुरता मर्यादित नसून, दीडशे वर्षांच्या ऐतिहासिक वारशाला साजेशी रेल्वे सुविधा वरोऱ्याला मिळावी, अशी व्यापक मागणी त्यामागे आहे.
इतिहास जाणून घेणे आणि वर्तमानासाठी लढणे आवश्यक
वरोरा शहराची नगर परिषद १८६७ मध्ये स्थापन झाली. त्यानंतरच्या काळात रेल्वे, कोळसा, व्यापार आणि औद्योगिक विकासामुळे वरोऱ्याने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले. आज या ऐतिहासिक वाटचालीकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. १८७७-७९ मध्ये रेल्वेने वरोऱ्याला जोडले; वरोरा टर्मिनस झाले; पुढे याच ठिकाणाहून रेल्वे चांदा आणि बल्लारशाहकडे गेली. हा केवळ भूतकाळ नाही, तर आजच्या पिढीसमोर उभा असलेला प्रश्न आहे—ज्या शहराला रेल्वे इतिहासात कधीकाळी टर्मिनसचे महत्त्व होते, त्या वरोऱ्याला आजच्या काळात पुरेशा रेल्वे सुविधा का मिळू नयेत?
दीडशतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या वरोऱ्याने आता आपल्या रेल्वे इतिहासाचे स्मरण करण्याबरोबरच भविष्यातील रेल्वे हक्कांसाठी संघटित आणि तथ्याधारित आवाज उठविण्याची वेळ आली आहे.
इतिहास सांगतो की वरोऱ्याचे रेल्वेच्या नकाशावर महत्त्व होते; आता वर्तमानाने सिद्ध करायचे आहे की वरोरा आजही रेल्वेच्या नकाशावर तितकेच महत्त्वाचे आहे!









