सत्य, विश्वासार्हता आणि जनहिताला प्राधान्य देण्याचा संस्थापक संपादक राजेंद्र मर्दाने यांचा निर्धार
शाहिद अख्तर यांजकडून
वरोरा : डिजिटल मीडिया आणि ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात वरोरा येथून ‘ओशनिक न्यूज ‘ च्या माध्यमातून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर शानदार हॉटेल शरयू सिद्धकला लॉन येथे आयोजित दिमाखदार समारंभात ‘ओशनिक न्यूज ’ या ऑनलाइन न्यूज पोर्टलचे विधिवत लाँचिंग व उद्घाटन झाले. सत्य, विश्वासार्हता आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचा, वंचिताचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस शंकर तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मोहनीश शेलवटकर, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, उद्योजक मधुसुदन टिपले तसेच ओशनिक न्यूजचे संस्थापक – संपादक राजेंद्र मर्दाने व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मोबाईलवर ‘ओशनिक न्यूज’चे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करून पोर्टलचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
‘समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बना’ – शेलवटकर
तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी डिजिटल युगात ऑनलाइन माध्यमांची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वपूर्ण होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आजच्या काळात माहितीचा प्रसार अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे डिजिटल माध्यमांवर विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारितेची मोठी जबाबदारी आहे. ‘ओशनिक न्यूज’ समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनेल आणि पत्रकारितेचे उच्च मापदंड कायम ठेवत निष्पक्षपणे काम करेल, असा विश्वास आहे.”
‘जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या’- नितीन मत्ते
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी डिजिटल माध्यमांच्या विश्वासार्हतेबाबत भाष्य करताना प्रिंट मीडियाच्या तुलनेत अनेक ऑनलाइन पोर्टल्सची विश्वासार्हता अद्याप वाचकांच्या अपेक्षेइतकी निर्माण झालेली नसल्याचे नमूद केले. “देशात अनेक न्यूज पोर्टल्स पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांना न्याय देताना दिसत नाहीत. मात्र ‘ओशनिक न्यूज’ त्याला निश्चितच अपवाद ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकारण्यांना अनावश्यक महत्त्व देण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांवर उहापोह करणे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आणि त्यावर उपाय सुचवीने आवश्यक आहे. जनतेच्या समस्या प्रखरपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देणे, ही पत्रकारितेची खरी भूमिका असली पाहिजे ,” असे मत्ते म्हणाले.
‘पोर्टल्सना आचारसंहिता आहे’- शंकर तडस
अध्यक्षीय भाषणात पत्रकार शंकर तडस यांनी डिजिटल पोर्टल्सबाबत असलेल्या गैरसमजांवर भाष्य केले. “पोर्टल्स बेलगाम असतात, असा आरोप सरसकट करणे योग्य नाही. डिजिटल माध्यमांनाही पत्रकारितेची आचारसंहिता आहे आणि तिचे पालन करणे आवश्यक आहे. ‘ओशनिक न्यूज’चे संस्थापक – संपादक राजेंद्र मर्दाने यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक बांधीलकी लक्षात घेता हे पोर्टल वाचकांच्या पसंतीस निश्चितच उतरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मधुसुदन टिपले, बंडूभाऊ देऊळकर आणि चेतन लूतडे यांनीही मनोगत व्यक्त करून ‘ओशनिक न्यूज’च्या भविष्यकालीन उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
‘सत्यापित बातम्यांना प्राधान्य’- राजेंद्र मर्दाने
संस्थापक संपादक राजेंद्र मर्दाने यांनी उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत ‘ओशनिक न्यूज’च्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
“वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर सत्य आणि सत्यापित माहिती देणे, हा ‘ओशनिक न्यूज’चा मुख्य उद्देश आहे. नैतिकता जपत विविध संवर्गातील बातम्यांसोबत जनहिताच्या विषयांवर विशेष लेख, विश्लेषण आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वाचकांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद असेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘ओशनिक परिवारा’तर्फे उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते भूषण लालसरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सभापती शेख जैरुद्दीन छोटूभाई, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तथा माजी प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, डॉ. प्रवीण मुधोळकर, वरोरा नगरपरिषदेचे नियोजन व वित्त सभापती राहुल देवडे, पत्रकार राजू कुकडे, शाहीद अख्तर, शेख शफी, सामाजिक कार्यकर्ते विवेक बर्वे, विजय वैद्य, संजय गांधी, सोनू बहादे, अंकुश दडमल, विजय दडमल यांच्यासह शहरातील वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि विविध डिजिटल क्रिएशन क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी ‘ओशनिक न्यूज’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पोर्टलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशोक बावणे यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी आणि सर्व सहकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले.









