३९ झाडांवर फुलली पाणपक्ष्यांची मिश्र विण वसाहत; दोन वर्षांत २,१५७ घरट्यांची नोंद — जैवविविधतेचा अनमोल ठेवा जपण्याची गरज
प्रतिनिधी : प्रवीण कडू
हिंगणघाट : शहराच्या वाढत्या विस्तारात काँक्रीटचे जंगल निर्माण होत असताना हिंगणघाटच्या मध्यवर्ती भागात निसर्गाचा एक अनोखा ठेवा आजही जिवंत आहे. तहसील कार्यालय परिसरातील झाडांवर गेल्या अनेक वर्षांपासून विविध पाणपक्ष्यांची मिश्र विण वसाहत (Heronry) बहरत असून, येथे हजारो पक्षी प्रजननासाठी येत आहेत. शहराच्या मध्यभागी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणपक्ष्यांची वसाहत असणे ही हिंगणघाटच्या दृष्टीने अभिमानाची तसेच पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
ही वसाहत म्हणजे केवळ पक्ष्यांनी घरटी बांधलेली जागा नाही, तर शहर आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्वाचे जिवंत उदाहरण आहे. गाय बगळा, छोटा बगळा, छोटा पाणकावळा, भारतीय पाणकावळा, रात ढोकरी यांसह विविध पाणपक्षी येथे आपला संसार थाटतात. सन २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या बगळ्याची (Great Egret) तीन घरटीही आढळून आली आहेत.
दोन वर्षांच्या गणनेत २,१५७ घरटी
‘निसर्गसाथी, हिंगणघाट’ यांच्या वतीने या वसाहतीतील घरट्यांची नियमित नोंद घेतली जात आहे. हेरॉनरीचा प्रजनन कालावधी साधारण सहा महिन्यांचा असल्याने विविध पक्षी वेगवेगळ्या कालावधीत प्रजनन करतात. त्यामुळे घरटी गणना दोन टप्प्यांत करण्यात येते.
सन २०२५ मध्ये : जून — ९१५ घरटी, सप्टेंबर — १५८ घरटी, एकूण — १,०७३ घरटी
सन २०२६ मध्ये : जून — ४३८ घरटी, सप्टेंबर — ६४६ घरटी, एकूण — १,०८४ घरटी.
व अशा प्रकारे २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांतील दोन टप्प्यांच्या गणनेत एकूण २,१५७ घरट्यांची नोंद झाली आहे.
हे आकडे केवळ संख्यात्मक नोंद नाहीत. प्रत्येक घरटे म्हणजे एका पक्षी कुटुंबाचा आश्रय, प्रजननाचे केंद्र आणि पुढील पिढीच्या निर्मितीची जागा आहे.
३९ झाडांवर उभे आहे पक्ष्यांचे ‘नगर’
या पाणपक्षी वसाहतीतील घरटी तब्बल ३९ झाडांवर आढळून आली आहेत. वड, पिंपळ, खोटा अशोक, केशिया सेमिया, देशी बाभूळ, सिसम, करंज, कडुनिंब आणि अर्जुन अशा विविध वृक्षांवर पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहेत.
या वसाहतीतील प्रत्येक झाड पक्ष्यांसाठी केवळ वृक्ष नाही; ते त्यांचे घर, प्रसूतीगृह, बालसंगोपन केंद्र आणि सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यामुळे हेरॉनरीचे संवर्धन करायचे असेल तर सर्वप्रथम या झाडांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गाची खुली प्रयोगशाळा
शहरांच्या विस्तारामुळे पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास कमी होत असताना हिंगणघाटच्या मध्यवर्ती भागातील ही वसाहत विशेष महत्त्वाची ठरते. नागरिकांना आपल्या शहरातील जैवविविधता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी येथे मिळते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ही वसाहत निसर्गाची खुली प्रयोगशाळा ठरू शकते. पक्षी घरटे कसे बांधतात, कोणता पक्षी कोणत्या वृक्षाचा आधार घेतो, प्रजनन काळात पक्ष्यांच्या वर्तनात कोणते बदल होतात आणि विविध प्रजाती एकाच परिसरात कशा प्रकारे सहअस्तित्व राखतात, याचा प्रत्यक्ष अभ्यास येथे करता येतो.
विकास हवा; मात्र निसर्गाच्या किमतीवर नव्हे!
या वसाहतीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पक्ष्यांना शांत आणि सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. विशेषतः प्रजनन काळात मोठा आवाज, फटाके, डीजे, लेझर लाईट, अनावश्यक गर्दी तसेच झाडांची छाटणी किंवा तोड यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे शहरातील विकासकामे, सौंदर्यीकरण किंवा इतर बांधकामे करताना या वसाहतीचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे. एखादे झाड तोडणे म्हणजे केवळ एक वृक्ष गमावणे नव्हे; त्या झाडावरची अनेक घरटी आणि त्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात येणे होय.
हिंगणघाटची ‘जैवविविधतेचे शहर’ म्हणून नवी ओळख
हिंगणघाटची ओळख औद्योगिक आणि व्यापारी शहर म्हणून आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील ही हेरॉनरी हिंगणघाटला ‘जैवविविधतेचे शहर’ अशी नवी ओळख मिळवून देण्याची क्षमता बाळगते.
या वसाहतीचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण, नियमित घरटी गणना, वृक्षसंवर्धन, माहितीफलक, पक्षी निरीक्षणासाठी योग्य व्यवस्था आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली, तर ही जागा पर्यावरणप्रेमी, पक्षी निरीक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकते.









