Home प्रादेशिक वरोरा रेल्वे स्थानकाचा जुना चेहरा – भाग ३

वरोरा रेल्वे स्थानकाचा जुना चेहरा – भाग ३

10

वरोरा रेल्वे स्थानकाचा जुना चेहरा – भाग ३

स्टेशन, कोळसा यार्ड, मालवाहतूक आणि विस्मृतीत गेलेल्या रेल्वेच्या खुणा

दीडशे वर्षांपूर्वी वरोरा स्थानकाभोवती कसे उभे राहिले रेल्वेचे आर्थिक विश्व?

                       राजेंद्र मर्दाने

वरोरा : ‘वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाची दीडशतकाकडे वाटचाल’ या लेखमालेच्या पहिल्या भागात वरोऱ्यापर्यंत रेल्वे पोहोचण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि एकेकाळी वरोरा हे रेल्वेचे टर्मिनस असण्याचा संदर्भ आपण पाहिला. दुसऱ्या भागात रेल्वे आणि वरोऱ्याच्या ‘काळ्या सोना’चे म्हणजेच कोळशाचे असलेले अतूट नाते उलगडले.
आता तिसऱ्या भागात प्रश्न आहे तो त्या काळातील वरोरा रेल्वे स्थानकाचा!
आज आपण वरोरा रेल्वे स्थानकाकडे आधुनिक रेल्वे स्थानकाच्या नजरेने पाहतो. मात्र सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे वरोरा स्थानक हे केवळ प्रवाशांची चढ-उतार करण्याचे ठिकाण नव्हते. त्यामागे कोळसा, मालवाहतूक, व्यापार, रेल्वे कर्मचारी, स्थानिक बाजारपेठ आणि प्रदेशाच्या आर्थिक हालचालींशी जोडलेली एक मोठी व्यवस्था कार्यरत होती.
आज त्या काळातील या व्यवस्थेच्या अनेक खुणा काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मात्र उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ आणि जुन्या नोंदींच्या आधारे त्या काळातील वरोरा रेल्वे स्थानकाचे चित्र उभे करण्याचा हा एक प्रयत्न.

वरोरा स्थानक आणि ‘वरोरा कोळसा क्षेत्र’

ब्रिटिशकालीन आर्थिक व प्रशासकीय नोंदींमध्ये वरोरा परिसरातील कोळसा क्षेत्राचा उल्लेख आढळतो. १८७०च्या दशकात सरकारी कोलियरीशी संबंधित हालचाली सुरू झाल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे वरोऱ्याची रेल्वे ओळख सुरुवातीपासूनच कोळसा क्षेत्राशी जोडली गेली होती, असे दिसून येते.
रेल्वे वरोऱ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोळशाची वाहतूक पारंपरिक साधनांवर अवलंबून होती. मात्र रेल्वेचा विस्तार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातील कोळसा तुलनेने दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. यामुळे रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन न राहता कोळसा आणि इतर मालाच्या वाहतुकीची महत्त्वाची जीवनवाहिनी बनली.

‘कोळसा’ म्हणजे केवळ माल नव्हता!

१९ व्या उत्तरार्धात विदर्भातील कोळसा  आणि कापसाच्या वाहतुकीला रेल्वेमुळे मोठी चालना मिळाली. वरोरा परिसरातील कोळसा रेल्वेच्या माध्यमातून विविध भागांत पोहोचविण्याची व्यवस्था विकसित झाली. रेल्वेच्या इंजिनांसाठी इंधन म्हणूनही कोळशाला मोठे महत्त्व होते. दुसरीकडे वर्धा पट्ट्यातील कापूस मुंबईकडे आणि तेथून पुढे समुद्री मार्गाने परदेशी बाजारपेठांकडे जाणाऱ्या व्यापारसाखळीचा भाग बनला.
यातून एक महत्त्वाचे ऐतिहासिक चक्र स्पष्ट होते—कोळसा रेल्वेला ऊर्जा देत होता आणि रेल्वे कोळशाला बाजारपेठ उपलब्ध करून देत होती. वरोऱ्याच्या आर्थिक इतिहासात रेल्वे आणि कोळशाचे हे परस्परावलंबी नाते त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

मालवाहतुकीचे केंद्र म्हणून वरोरा

वरोरा स्थानकाचे महत्त्व केवळ कोळशापुरते मर्यादित नव्हते. वरोरा आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये कापूस, कडधान्ये, तेलबिया, लाकूड, कातडी तसेच विविध कृषी व वनउत्पादनांची उलाढाल होत असल्याचे तत्कालीन नोंदींवरून दिसते.
जंगलातून मिळणारे सागवान, बांबू, गोंद, लाख यांसारखी वनउत्पादनेही त्या काळच्या व्यापाराचा भाग होती. रेल्वेमुळे या वस्तूंची मोठ्या बाजारपेठांशी जोडणी सुलभ झाली. त्यामुळे स्थानकाच्या परिसरात केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर मालाची आवक-जावक, साठवणूक, चढ-उतार आणि व्यापारी व्यवहारांचीही स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली असावी.
आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास वरोरा हे केवळ ‘प्रवासी स्थानक’ नव्हते; तर त्यामागे एक मोठी मालवाहतूक अर्थव्यवस्था (Freight Economy) कार्यरत होती.

‘वरोरा प्रवासी’ आणि ‘वरोरा कोळसा’ : दोन वेगळे संदर्भ

जुन्या रेल्वे संदर्भांमध्ये वरोऱ्याशी संबंधित प्रवासी आणि कोळसा वाहतुकीच्या स्वतंत्र नोंदी आढळतात. यावरून त्या काळात वरोऱ्याच्या रेल्वे व्यवस्थेचे दोन प्रमुख पैलू स्पष्ट होतात. प्रवाशांची वाहतूक आणि मालाची वाहतूक.
एकीकडे प्रवासी रेल्वेने अधिकारी, व्यापारी, कामगार आणि सामान्य नागरिकांची ये-जा होत होती; तर दुसरीकडे कोळसा, कापूस आणि अन्य माल रेल्वेच्या माध्यमातून पुढे पाठविला जात होता.
रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात काही मार्गांवर प्रवासी आणि मालवाहतूक एकाच व्यवस्थेचा भाग असल्याचेही आढळते. त्यामुळे त्या काळातील रेल्वेची कल्पना आजच्या स्वतंत्र प्रवासी आणि मालगाड्यांपेक्षा काहीशी वेगळी होती.

स्थानकाच्या मागे उभे होते एक ‘रेल्वेचे जग’

आज रेल्वे स्थानक म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकी, प्रतीक्षालय आणि गाड्या एवढेच चित्र उभे राहते. मात्र १९ व्या शतकातील वरोरा रेल्वे स्थानकाचा विचार केला, तर त्यामागे एक मोठी व्यवस्था उभी असल्याची कल्पना करता येते.
प्रवासी व्यवस्था, मालाची हाताळणी, कोळशाची साठवणूक व वाहतूक, वॅगनची ये-जा, रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत, इंजिनांसाठी इंधनाची व्यवस्था, मालाची चढ -उतार व्यवस्था आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी संबंधित अनेक छोटी-मोठी कामे या सर्वांचा रेल्वेच्या आर्थिक जगात समावेश होता.
वरोऱ्याच्या बाबतीत कोळसा क्षेत्र जवळ असल्याने या व्यवस्थेला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले असावे.

रेल्वे आली आणि वरोऱ्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली

रेल्वेच्या आगमनाने केवळ वाहतुकीचा वेग वाढला नाही, तर वरोऱ्याच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनालाही नवी दिशा मिळाली.
रेल्वे कर्मचारी, खाणकामगार, व्यापारी, हमाल, कारागीर आणि विविध व्यवसायांशी संबंधित लोकांची वर्दळ वाढली. बाहेरील भागांतील लोक वरोऱ्यात येऊन स्थायिक होऊ लागले. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत आणि बाजारपेठेच्या विस्तारातही बदल झाला. रेल्वे आणि कोळसा क्षेत्राच्या विकासामुळे वरोऱ्याच्या नागरीकरणाला चालना मिळाल्याचे चित्र इतिहासातून समोर येते.
म्हणजेच रेल्वे स्थानक हे शहरापासून वेगळे असलेले ठिकाण नव्हते; उलट स्थानकाभोवतीच वरोऱ्याच्या नव्या आर्थिक हालचालींचे एक विश्व आकार घेत होते.

कोळशाच्या वाढत्या महत्त्वाने रेल्वेचे महत्त्वही वाढले

१८७० -८०च्या दशकात वरोरा रेल्वे स्थानकाचे महत्त्व केवळ प्रवासी वाहतुकीपुरते राहिले नाही. कोळसा, मालवाहतूक, व्यापार आणि रेल्वेच्या वाढत्या गरजा यामुळे वरोरा रेल्वेच्या आर्थिक नकाशावर महत्त्वाचे ठिकाण बनत गेले. पुढील काळात वरोरा परिसरातील कोलियरीशी संबंधित इतर उद्योगांचाही विकास झाला. यामुळे वरोरा परिसरातील अर्थव्यवस्था हळूहळू खनिज, रेल्वे, व्यापार आणि उद्योग या परस्परांशी जोडलेल्या चौकटीचा भाग बनली.

टर्मिनसपासून पुढे वाढत गेलेले रेल्वेचे जाळे

वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचे सुरुवातीचे टर्मिनस म्हणून असलेले स्थान.
रेल्वे मार्गाचा पुढे विस्तार होत गेला आणि चांदा (चंद्रपूर) तसेच त्यापुढील बल्हारशाहकडे रेल्वे पोहोचली. त्यामुळे वरोऱ्याचे टर्मिनस म्हणून असलेले प्रारंभीचे महत्त्व कालांतराने बदलले.
मात्र यामुळे वरोऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. उलट, रेल्वेच्या या विस्ताराच्या सुरुवातीच्या टप्प्यात वरोरा हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता, हे अधिक स्पष्ट होते. वरोरा हे केवळ रेल्वेच्या मार्गावरील एक स्थानक नव्हते; रेल्वेच्या विस्ताराच्या एका महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात येथे झाली होती.

पण त्या काळाच्या खुणा आज कुठे आहेत?

जवळपास दीडशे वर्षांच्या या प्रवासात रेल्वेची तंत्रज्ञान व्यवस्था बदलली. वाफेच्या इंजिनांची जागा आधुनिक विद्युत रेल्वेने घेतली. मालवाहतुकीचे स्वरूप बदलले. कोळशाचे आर्थिक महत्त्व बदलले. स्थानकांची रचना बदलली.
पण रेल्वेच्या जुन्या खुणा म्हणजे केवळ दगड, लोखंड, पाण्याच्या टाक्या, जुने बांधकाम किंवा अवशेष नाहीत. त्या वरोऱ्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक इतिहासाच्या साक्षीदार आहेत. म्हणूनच वरोरा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जुन्या खुणांचा शास्त्रीय आणि दस्तऐवजी पद्धतीने शोध घेणे गरजेचे आहे.

रेल्वेने वरोऱ्याला देशाच्या आर्थिक प्रवाहाशी जोडले

वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाचा हा टप्पा एका महत्त्वाच्या सत्याची आठवण करून देतो. रेल्वे वरोऱ्यात केवळ प्रवाशांना घेऊन आली नव्हती; तिने वरोऱ्याला देशाच्या मोठ्या आर्थिक प्रवाहाशी जोडले होते. कोळसा, कापूस, वनउत्पादने, कृषीमाल, व्यापारी माल आणि माणसांची ये-जा—या सर्वांना रेल्वेने एक नवा मार्ग दिला.
ज्या वरोऱ्याने कधीकाळी रेल्वेला टर्मिनस दिले, त्या वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाच्या किती खुणा आज आपल्या डोळ्यांसमोर आहेत? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न—
१८७०च्या दशकातील त्या रेल्वे व्यवस्थेचे आज आपल्या शहरात कोणते पुरावे शिल्लक आहेत?
याच प्रश्नाचे उत्तर शोधताना वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या खुणा आपल्या समोर येतात.
त्यापैकी एक खुण म्हणजे १८७७ हे वर्ष कोरलेली जुनी पाण्याची टाकी. ही टाकी नेमकी कशासाठी उभारण्यात आली होती? तिचा रेल्वेच्या सुरुवातीच्या काळाशी काय संबंध होता? आणि तिच्यावर कोरलेले ‘१८७७’ हे वर्ष वरोरा रेल्वेच्या इतिहासाबद्दल आपल्याला नेमका कोणता धागा देते?
या प्रश्नांचा शोध घेऊया पुढील भागात…
— क्रमशः —