Home Chandrapur नवरात्री महोत्सव २०२६; बारुला दुर्गा उत्सव मंडळाचा भव्य आगमन सोहळा

नवरात्री महोत्सव २०२६; बारुला दुर्गा उत्सव मंडळाचा भव्य आगमन सोहळा

10

विविध आकर्षक उपक्रमामुळे आगमन सोहळ्याला विशेष रंगत ; रील्स स्पर्धेचे आयोजन

तुषार मर्दाने

वरोरा : शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वाच्या स्वागतासाठी वरोरा शहरातील दत्त मंदिर वॉर्डातील बारुला दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी माता राणीचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मागील २३ वर्षांपासून नवरात्री उत्सवाची परंपरा जपणाऱ्या मंडळाच्या वतीने यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
माता राणीच्या आगमन सोहळ्यात भव्य आतषबाजी, बग्गी, गंगा आरती, आखाडा, अघोरी शो, आकर्षक झांकी, डीजे, पेपर ब्लास्ट, भजन, फायर क्रॅकर आणि बँड यांसह विविध कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पारंपरिक धार्मिक वातावरणासोबतच विविध आकर्षक उपक्रमांमुळे आगमन सोहळ्याला विशेष रंगत येणार आहे.
यंदाच्या नवरात्री महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे रील्स स्पर्धा. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्री उत्सवाची संस्कृती, भक्तिभाव आणि उत्साह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये देण्यात येणार आहे.
या भव्य आगमन सोहळ्याच्या आयोजनासाठी मेघा खान, रोहिणी उईके, अनिता पेंदाम, बबिता उईके, स्मिता कावळे, शशिकला मेश्राम, कल्पना मेश्राम, कुंदा मेश्राम, दुर्गा मेश्राम, नंदा आत्राम, प्रतिमा गेडाम, रोशनी भडके, स्वाती मेश्राम, प्रिया मेश्राम, सविता कोडापे आदी महिला भगिनी परिश्रम घेत आहेत.
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या भव्य माता राणी आगमन सोहळ्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.