तुषार मर्दाने
वरोरा (शेगाव बु.),दि. ६ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी चर्चेत असलेल्या ‘कवितेच्या घर’ या उपक्रमात आता दर्जेदार कवितासंग्रहांचा सन्मान करण्याची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगाव (बु.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घराच्या वतीने महाराष्ट्रातील कवींच्या उत्कृष्ट कवितासंग्रहांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार चंद्रपूर येथील कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील श्रीकांत पाटील यांच्या ‘सागरलाटा’ या संग्रहाला, तर बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय गझलसंग्रह पुरस्कार ठाणे येथील माधुरी बर्वे यांच्या ‘आरसा मनाचा’ या गझलसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कारप्राप्त कवींना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय विशेष कवितासंग्रह पुरस्कारासाठी नाशिक येथील रवींद्र दळवी यांच्या ‘दिवाबत्ती’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. त्यांना ३ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वेदांत अपार्टमेंट, कॉसमॉस टाऊन, नागपूर येथे ५ सप्टेंबर रोजी आयोजित पुरस्कार घोषणा कार्यक्रमात या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी संजय गोडघाटे, पेण येथील साहित्यसंपदा प्रकाशनचे वैभव धनावडे, श्रावण सुरंशे, ग्रंथालय चळवळीतील विश्वास सहस्रबुद्धे, कवितेच्या घराचे संकल्पनाकार किशोर पेटकर, कार्यवाह प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, प्रसिद्धीप्रमुख विकास जवादे, प्रेमसागर पाटील आणि नितीन वैद्य आदी उपस्थित होते.
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून उत्कृष्ट कवितासंग्रहांची निवड करून हे पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर (कल्याण), कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले (बदलापूर) आणि प्रसिद्धीप्रमुख सूर्यकांत पाटील (वरोरा) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.









