वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाची दीडशतकाकडे वाटचाल
भाग -२
बैलगाड्यांपासून रेल्वे वॅगनपर्यंतचा प्रवास; वरोरा टर्मिनसपासून चांदा – बल्हारशाहच्या विस्ताराची ऐतिहासिक कहाणी
राजेंद्र मर्दाने
वरोरा : वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाची दीडशतकाकडे वाटचाल या लेखमालेच्या पहिल्या भागात वरोऱ्यापर्यंत रेल्वे पोहोचण्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि एकेकाळी वरोरा हे रेल्वेचे टर्मिनस असण्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र वरोऱ्याची रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतुकीची सोय नव्हती. तिच्या मुळाशी होते वरोऱ्याच्या भूमीत दडलेले *‘काळे सोने’* – कोळसा!
रेल्वे आणि कोळसा यांचे हे नाते समजून घेतल्याशिवाय वरोऱ्याच्या रेल्वे इतिहासाचे महत्त्व पूर्णपणे समजून घेता येत नाही.
कोळशाच्या खाणींनी वेधले ब्रिटिशांचे लक्ष
वरोरा परिसरातील कोळशाच्या साठ्याचे महत्त्व ब्रिटिश प्रशासनाला १९व्या शतकाच्या उत्तरार्धात जाणवले होते. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार वरोरा येथील सरकारी कोलियरीचे कामकाज १८७१ पासून सुरू होते. पुढील काळात या खाणीतून मोठ्या प्रमाणावर कोळसा काढला जाऊ लागला. मात्र कोळसा काढणे आणि तो बाजारपेठेपर्यंत किंवा रेल्वेपर्यंत पोहोचवणे हे त्या काळातील मोठे आव्हान होते. रेल्वे वरोऱ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी वाहतुकीसाठी पारंपरिक साधनांवरच मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते
बैलगाड्यांवरून कोळशाची वाहतूक
१८७७ च्या आसपासच्या समकालीन नोंदी वाचल्या तर त्या काळातील वाहतुकीचे चित्र स्पष्ट होते. रेल्वेचा मार्ग अजून वरोऱ्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नसताना कोळसा रेल्वेच्या उपलब्ध टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी बैलगाड्यांचा वापर करावा लागत होता. कल्पना करा—आज रेल्वे वॅगनमधून हजारो टन माल सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. परंतु दीडशे वर्षांपूर्वी याच परिसरातील कोळसा बैलगाड्यांच्या ताफ्यांमधून वाहून नेला जात होता. रेल्वे वरोऱ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे या वाहतूक व्यवस्थेत झालेली एक ऐतिहासिक क्रांतीच होती.
रेल्वेचे नियोजन आणि वरोऱ्याचे महत्त्व
१८७६-७७ च्या Bombay Administration Report मध्ये वर्धा व्हॅली रेल्वेचा उल्लेख करताना हिंगणघाटपर्यंतचा मार्ग जूनच्या आसपास खुला होण्याची आणि वरोऱ्यापर्यंत रेल्वे १८७८ च्या सुरुवातीस पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या एका नोंदीतून त्या काळात वरोरा रेल्वेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे ठिकाण बनत होते, याची कल्पना येते. नंतरच्या रेल्वे इतिहासाच्या नोंदीनुसार Wardha–Warora State Railway चा मार्ग टप्प्याटप्प्याने विकसित झाला आणि फेब्रुवारी १८७९ मध्ये हा मार्ग पूर्ण झाल्याचे नमूद केले जाते. वर्धा ते वरोरा हा मार्ग सुमारे ४५ मैल म्हणजेच ७२ किलोमीटरचा होता.
वरोरा रेल्वे टर्मिनस!
आज आपण वरोरा स्थानकाकडे एका मार्गावरील स्थानक म्हणून पाहतो. मात्र इतिहासातील वरोऱ्याचे स्थान यापेक्षा कितीतरी मोठे होते. वरोरा हे एकेकाळी या रेल्वेचे टर्मिनस होते.
१९६३ मध्ये लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान डॉ. एम. एस. अणे यांनी वरोरा रेल्वेच्या इतिहासाचा उल्लेख करताना सुरुवातीला वरोरा हे या राज्य रेल्वेचे टर्मिनस असल्याचे सांगितले. त्यामागे मुख्य कारण होते वरोरा कोळसा क्षेत्र. यावरून रेल्वे आणि वरोरा कोळसा खाणीचा संबंध किती जवळचा होता हे दिसून येते.
केवळ प्रवासी वाहतूक नव्हे तर कोळसा, कापूस आणि व्यापार वाहतूक हा रेल्वे स्थापनेमागचा अत्यंत महत्वाचा आर्थिक हेतू होता. याच उद्देशातून पुढे वरोऱ्याहून चांदा पर्यंत रेल्वे वाढविण्यात आली आणि पुढे चांदा ते बल्हारशाह पर्यंत रेल्वे नेण्यात आली. म्हणजेच वरोरा हा केवळ रेल्वे मार्गावरील एक थांबा नव्हता; तो पुढील रेल्वे विस्ताराचा एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू होता.
वरोरा ते चांदा—नव्या अध्यायाची सुरुवात
फेब्रुवारी १८७८ च्या सुमारास वरोऱ्यापर्यंत रेल्वे आल्यानंतर तिचे महत्त्व आणखी वाढत गेले. चांदा जिल्ह्यातील विविध भागांमधून येणाऱ्या मालाच्या वाहतुकीसाठी वरोरा महत्त्वाचे केंद्र बनले.
Imperial Gazetteer मधील नोंदीनुसार त्या काळात चांदा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील बाह्य व्यापारासाठी वरोरा स्थानकाचा वापर केला जात होता. यामुळे वरोरा रेल्वे, व्यापार आणि मालवाहतूक यांचा परस्पर संबंध अधिक दृढ झाला.
रेल्वेमुळे केवळ कोळशाची वाहतूक सुलभ झाली नाही, तर कृषी उत्पादन, जंगलातून मिळणारा माल आणि इतर व्यापारिक वस्तूंच्या वाहतुकीलाही नवी दिशा मिळाली.
कोळसा, रेल्वे आणि औद्योगिक विकास
वरोरा परिसरातील कोळसा हा रेल्वेसाठीही महत्त्वाचा होता. १८७६-७७ च्या प्रशासन अहवालात वरोऱ्यातून (जवळपास ३६५१ टन) मिळणाऱ्या कोळशाचा उल्लेख आहे. त्या काळात Great Indian Peninsula Railway अर्थात GIPR ने कोळसा घेण्यासाठी करार केला होता.
मात्र वरोरा कोळशासमोर काही अडचणीही होत्या. कोळशाची गुणवत्ता इंग्लिश कोळशाच्या तुलनेत कमी असल्याचे त्या काळातील अहवालात नमूद करण्यात आले होते. तसेच रिकाम्या वॅगनची उपलब्धता आणि वाहतुकीचा खर्च यांसारख्या समस्या होत्या. यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते – रेल्वे केवळ वरोऱ्याच्या कोळशाला बाजारपेठ देत नव्हती; उलट कोळशाच्या उपलब्धतेमुळे वरोऱ्यापर्यंत रेल्वे आणण्यालाही आर्थिक कारणांची जोड होती.
वरोऱ्याच्या आर्थिक जीवनात बदल
रेल्वे आल्यानंतर वरोऱ्याच्या आर्थिक जीवनाला वेग मिळाला असावा, असे उपलब्ध ऐतिहासिक नोंदींवरून दिसून येते. मालाची वाहतूक अधिक दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. खाणकाम, व्यापार, वाहतूक आणि स्थानिक रोजगार यांना त्याचा परिणाम झाला.
रेल्वे स्थानकाभोवती बाजारपेठा विकसित होणे, मालवाहतुकीसाठी नवे व्यवसाय निर्माण होणे आणि दूरच्या भागाशी संपर्क वाढणे- या सर्व प्रक्रियांमध्ये रेल्वेची भूमिका महत्त्वाची ठरली.
म्हणूनच वरोऱ्याच्या इतिहासात रेल्वेचा उल्लेख हा केवळ ‘रेल्वे आली’ एवढ्यापुरता मर्यादित ठेवता येत नाही. रेल्वेने वरोऱ्याच्या आर्थिक भूगोलालाच नवे रूप दिले.
चांदा नंतर बल्हारशाहकडे…
वरोरा टर्मिनस असलेल्या काळानंतर रेल्वेचा विस्तार पुढे चांदाकडे झाला. पुढे बल्हारशाहकडे रेल्वे पोहोचली आणि संपूर्ण परिसराचा रेल्वे नकाशाच बदलला. उपलब्ध रेल्वे इतिहासाच्या नोंदीनुसार वरोऱ्यापासून पुढे चांदा आणि त्यानंतर बल्हारशाहकडे झालेला विस्तार हा या प्रदेशातील कोळसा आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाशी संबंधित होता. पुढील काळात बल्हारशाह हे दक्षिणेकडील महत्त्वाचे रेल्वे केंद्र बनले. परंतु या विस्ताराच्या इतिहासात वरोरा हा प्रारंभीचा टर्मिनस आणि महत्त्वाचा दुवा होता, ही बाब विसरता येणार नाही.
दीडशे वर्षांचा प्रश्न
आज आपण आधुनिक रेल्वेच्या युगात जगत आहोत. वेगवान गाड्या, विद्युतीकरण, दुहेरी आणि तिसरी रेल्वे लाइन, आधुनिक सिग्नल व्यवस्था—रेल्वेने प्रचंड प्रगती केली आहे. परंतु वरोऱ्याच्या बाबतीत इतिहास आपल्याला एक प्रश्न विचारतो –
ज्या शहराने दीडशे वर्षांपूर्वीच्या रेल्वे विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, त्या शहराचे आजच्या रेल्वे नकाशावरील स्थान आपण इतिहासाच्या त्या गौरवाशी सुसंगतपणे जपले आहे का?
हा प्रश्न केवळ भावनिक नाही. तो वरोऱ्याच्या व्यापाराचा, उद्योगाचा, शिक्षणाचा, रोजगाराचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न आहे.
इतिहासातून भविष्याकडे…
वरोऱ्याची रेल्वे दीडशतकाच्या उंबरठ्यावर उभी आहे. बैलगाड्यांवरून कोळसा वाहून नेण्याच्या काळापासून ते आधुनिक विद्युतीकृत रेल्वेच्या युगापर्यंतचा हा प्रवास केवळ लोखंडी रुळांचा नाही; तो वरोऱ्याच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक परिवर्तनाचा प्रवास आहे.
कधीकाळी वरोरा हे रेल्वेचे टर्मिनस होते. कोळशामुळे या शहराला आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. वरोऱ्याहून पुढे चांदा आणि बल्हारशाहकडे रेल्वे विस्तारली. काळ बदलला, रेल्वेचे मार्ग बदलले आणि वरोऱ्याचे रेल्वेतील स्थानही बदलत गेले.
मात्र इतिहासातील वरोऱ्याची ती भूमिका आजच्या पिढीने जाणून घेणे गरजेचे आहे. कारण इतिहास केवळ अभिमानासाठी नसतो; तो भविष्याची दिशा ठरविण्यासाठीही असतो.
— क्रमशः —