Home Chandrapur शासकीय सेवा नागरिकांच्या दारी; चिमूरमध्ये ‘सेवा संकल्प’ शिबिर
विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना; प्रमाणपत्रे, सातबारा, सनद व शिधापत्रिकांचे वितरण
तुषार मर्दाने
- चिमूर, दि. २९ सप्टेंबर : महसूल विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध प्रमाणपत्रे, सातबारा उतारे, सनद, शिधापत्रिका तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्रीधर राजमाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक कावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डूले तसेच नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना, पात्र लाभार्थी आणि योजनांचा लाभ घेण्याची कार्यपद्धती याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. सेतू केंद्रामार्फत विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे डिजिटल हयात प्रमाणपत्र, वन पट्टे धारकांना सातबारा उतारे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत सनद वाटप करण्यात आले.
आरोग्य, वन, भूमी अभिलेख, पंचायत समिती, कृषी, एकात्मिक आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, सेतू, पुरवठा आणि संजय गांधी निराधार शाखेसह विविध विभागांनी शिबिरात सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या स्टॉलवर नागरिकांना योजनांची माहिती तसेच अर्ज व समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : राजमाने
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अशा शिबिरांच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराला चिमूर तालुक्यातील नागरिक व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी शुभांगी आस्वले यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रवीण वानखेडे, कैलास बनसोड, देवानंद गावंडे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.