गणरायाला निरोप… अकोटच्या रस्त्यांवर भक्तीचा जल्लोष
‘ ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि बाप्पा मोरयाचा जयघोष’ करीत ५० मंडळाची विसर्जन मिरवणूक; पोपटखेडा धरणावर विधीवत विसर्जन
भरतराज मर्दाने
अकोट : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण , पुष्पवृष्टी अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात अकोट शहरातील गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. घरगुती गणपतींसह शहरातील जवळपास ८० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती.
तत्पूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. गणेश मंडळानी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, यासह गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले होते.
शहरात गणेशोत्सव दरम्यानच्या तेरा दिवसांच्या उत्सवकाळात विविध मंडळांकडून आकर्षक सजावट, देखावे, विद्युत रोषणाई तसेच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी अन्नदान व भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
विसर्जन मिरवणुकीत ५० मंडळाचा समावेश
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ५० सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी १ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती. ढोल-ताशा पथक, बँड पथक, भजन मंडळी, दिंडी, पारंपरिक वाद्ये तसेच मिनी डीजेच्या तालावर तरुणाई आणि गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
मिरवणुकीत गणेशमूर्तींची आकर्षक सजावट, सुशोभित कलाकृती आणि विविध सामाजिक संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरले. मिरवणूक पाहण्यासाठी महिला, बालकांसह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील सोनू चौक, गवळीपुरा, यात्रा चौक, कालंका चौक, वीर लहुजी सावळे चौक, मोठी मठी, केशवराज वेटाळ, बडा अलावा, शौकत अली चौक आणि सोनार लाइन मार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोहोचली.
पोपटखेड धरणावर विसर्जन
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून पुढे अकोट शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या पोपटखेड धरणावर गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
विसर्जनाच्या वेळी शेतकरी बांधवांनीही गणरायाला साकडे घातले. ‘दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची सर्वांना शक्ती दे आणि सर्वांना निरोगी ठेव’ अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.
प्रशासनाचे चोख नियोजन
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, पोलीस प्रशासन, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक तयारी केली होती. शहरातील संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील, तहसीलदार डॉ. सुनील चांडक, मुख्याधिकारी शशिकांत बाबर, पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे, ग्रामीण पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे आदी परिस्थितीवर नजर ठेवून होते. महावितरणचे इंजिनिअर व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, नगर परिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार आणि अन्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच एकलव्य बचाव पथकानेही विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.









