Home प्रादेशिक अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा : हेक्टरी ५० हजारांची मागणी...

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा : हेक्टरी ५० हजारांची मागणी ; काँग्रेसचे अकोटमध्ये एकदिवसीय उपोषण

12

 

By : *भरतराज मर्दाने*

*अकोट* : अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, तसेच पीक विम्याची नुकसानभरपाई व तातडीचा आर्थिक दिलासा द्यावा, या मागण्यांसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
यावर्षी झालेल्या अत्यल्प व अनियमित पावसामुळे अकोला जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई, कृषी कर्ज वसुलीला स्थगिती आणि दुष्काळग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.
शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर मनोज लोणारकर, उपविभागीय अधिकारी, अकोट यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
उपोषणात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.