सदाशिवराव ताजने : अपंगत्वावर मात करून सेवेला जीवनाचे ध्येय मानलेले शक्तीपीठ
स्वतः दिव्यांग असतानाही शेकडो दिव्यांगांना स्वावलंबनाचा मार्ग; आनंदवनाच्या सेवाविचाराचा सातत्याने प्रसार
राजेंद्र मर्दाने
वरोरा : आयुष्याच्या वाटेवर संकटे आली म्हणून थांबायचे नाही, परिस्थितीने पायाखालची जमीन हिरावून घेतली तरी ध्येयाकडे वाटचाल थांबवायची नाही आणि स्वतःच्या वेदनेचे रूपांतर इतरांच्या आयुष्यात आशेच्या प्रकाशात करायचे, ही जीवनदृष्टी प्रत्यक्ष कृतीतून जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सदाशिवराव नत्थुजी ताजने.
स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी, त्यांच्या कौशल्य विकासासाठी, वैवाहिक जीवनासाठी आणि सामाजिक सन्मानासाठी आयुष्य समर्पित करणारे सदाशिवराव आज आनंदवनाच्या सेवाविचाराचे एक महत्त्वाचे वाहक बनले आहेत.
२२ सप्टेंबर १९५३ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राळेगाव येथे एका सामान्य, आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परीट कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आठ भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे. वयाच्या अवघ्या दोन वर्षांचे असताना पोलिओने त्यांच्या दोन्ही पायांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, शरीराच्या मर्यादांना त्यांनी कधीही मनाच्या मर्यादा बनू दिल्या नाहीत. प्राथमिक शिक्षण राळेगावात पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते वरोरा येथे आले. घरापासून शाळेपर्यंतचे सुमारे तीन किलोमीटरचे अंतर ते हातांमध्ये चप्पल घालून, स्वतःला ओढत-उड्या घेत पार करीत. त्यांच्या चालण्याची पद्धत पाहून काही मुले टिंगल-टवाळी करीत; मात्र या उपहासाने त्यांचा आत्मविश्वास कधीच डळमळला नाही. उलट, प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासात त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
आनंदवनाने दिली जीवनाला नवी दिशा
शालेय जीवनात काही नेत्रहीन विद्यार्थ्यांकडून त्यांना आनंदवनाविषयी माहिती मिळाली. कुतूहलापोटी त्यांनी आनंदवनाला भेट दिली. तेथे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी दिलेली आपुलकी, माणुसकी आणि सन्मानाची वागणूक त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. त्या भेटीने त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मामांवर आर्थिक भार पडू नये, या विचारातून त्यांनी १९७२ मध्ये आनंदवनात प्रवेश घेतला. येथे त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतले आणि १९७७ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आनंदवनाने त्यांना केवळ व्यवसायाचे शिक्षण दिले नाही, तर स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, समता आणि मानवसेवेची जीवनदृष्टी दिली.
याच काळात त्यांना आनंदवनातील ‘संधीनिकेतन’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढे डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदवनातील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांग जीवनसाथीची निवड
१९७८ मध्ये मूकबधिर युवती आशा येणप्रेडीवार आनंदवनात शिलाई मशीनचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या. त्या वेळी सदाशिवराव ताजने शाळेचे प्रमुख होते. आशाताईंच्या जिद्दीने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्या विवाहाला जातीय आणि सामाजिक विरोधाचा सामना करावा लागला. मात्र बाबा आमटे आणि साधनाताईंनी पुढाकार घेत दोन्ही कुटुंबांचे मन वळवले. अखेर २ फेब्रुवारी १९८० रोजी आनंदवनातील मित्रमेळाव्यात त्यांचा विवाह झाला. हा आनंदवनातील सुरुवातीच्या काळातील उल्लेखनीय आंतरव्यंग आणि आंतरजातीय विवाहांपैकी एक ठरला.
ह्या विवाहसोहळ्याला साहित्य, संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाहानंतर सदाशिवराव आणि आशाताई यांनी केवळ आपले संसारजीवन यशस्वी केले नाही, तर अनेक दिव्यांगांना संसाराचा आधार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
त्यांच्या सहजीवनातील परस्पर समन्वय, त्याग आणि समर्पण आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या राजेश आणि योगेश या दोन्ही मुलांनी तसेच सुनांनी उच्च शिक्षण घेतले असून कुटुंबानेही आनंदवनाच्या सेवाविचाराशी नाते कायम ठेवले.
दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी अखंड धडपड
सदाशिवरावांनी आपल्या वैयक्तिक संघर्षाला व्यापक सामाजिक कार्याचे रूप दिले. दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांनी आत्मसन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
दिव्यांगांचे विवाह जुळवून देणे हे त्यांच्या कार्यातील विशेष अंग बनले. आतापर्यंत शेकडो दिव्यांग आणि आंतरजातीय विवाहांना त्यांनी मदत केली असून, अनेक कुटुंबांना नव्या जीवनाची सुरुवात करून देण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. विवाहाच्या तयारीपासून वधू – वरांना मानसिक आधार देण्यापर्यंत आशाताईंचीही त्यांना मोलाची साथ लाभली.
या कार्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना केवळ जीवनसाथी मिळाला नाही, तर समाजात सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळाला.
‘स्वरानंदवन’ मधून कलागुणांना व्यासपीठ
सदाशिवराव ताजने यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे ‘स्वरानंदवन’. मागील सुमारे २४ वर्षांपासून ते या अनोख्या सांस्कृतिक उपक्रमाशी जोडलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती तसेच कुष्ठरोगमुक्त कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
‘स्वरानंदवन’ हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यम राहिले नाही, तर कलाकारांच्या आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक स्वीकाराला बळ देणारे व्यासपीठ ठरले आहे.
देशाच्या विविध भागांतून आनंदवनाला भेट देणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणे, आनंदवनाच्या कार्याची माहिती देणे आणि स्वरानंदवनाचा कार्यक्रम सादर करून दाखवणे, हा त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग झाला आहे.
आनंदवनाच्या विचारांचा चालता-बोलता दूत
महारोगी सेवा समितीचे विश्वस्त म्हणून सदाशिवराव ताजने आजही आनंदवनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. अनेक वर्षे डॉ. विकास आमटे यांच्या सोबत काम करताना त्यांनी आनंदवनाच्या विविध प्रकल्पांना हातभार लावला.
आनंदवन म्हणजे केवळ कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणारी संस्था नाही, तर मानवाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारी, श्रमाला प्रतिष्ठा देणारी आणि उपेक्षितांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी देणारी विचारधारा आहे. ही विचारधारा देशभर पोहोचविणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सदाशिवराव ताजने यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासन तसेच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे
आजही सेवाव्रताची वाटचाल कायम
आनंदवनात त्यांच्या कार्याला जवळपास ५५ वर्षे झालीत. आज जीवनाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण करत असतानाही त्यांच्या सेवाव्रताला विराम मिळालेला नाही. पत्नी आशाताईंच्या निधनानंतरही त्यांनी आपला सेवामार्ग सोडला नाही. उलट, आनंदवनाच्या विचारांचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्याचे काम ते अधिक निष्ठेने करीत आहेत.
त्यांच्या जीवनाकडे पाहिले की जाणवते—अपंगत्व शरीराला असू शकते; परंतु जिद्द, आत्मविश्वास आणि सेवाभावाला अपंगत्व नसते.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत छोट्या-छोट्या कारणांवरून नात्यांमध्ये निर्माण होणारे ताण, मतभेद आणि दुरावे पाहायला मिळतात. अशा वेळी सदाशिवराव आणि आशाताई ताजने यांच्या सहजीवनाची कहाणी परस्पर विश्वास, समन्वय, त्याग आणि समर्पणाचा सुंदर आदर्श ठरते.
स्वतःच्या आयुष्याला अर्थ देतानाच इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या सदाशिवराव ताजने यांचे जीवन म्हणजे संघर्षावर मात करण्याची प्रेरणा, सेवेतून समाधान मिळवण्याचा मार्ग आणि माणुसकीवर विश्वास ठेवण्याचा संदेश आहे.
म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना एका ओळीची आठवण होते-
“दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती…”
आनंदवनाच्या मातीतून उगवलेले हे सेवाव्रती व्यक्तिमत्त्व आजही अनेकांच्या जीवनात आशेचा आणि स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित करीत आहे.