Home संस्कृती अकोट शहरात बैलपोळा उत्साहात

अकोट शहरात बैलपोळा उत्साहात

22

खानापूर वेस परिसरात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मर्दाने परिवाराची अनेक दशकांची परंपरा 

                    भरतराज मर्दाने

अकोट : शेतकऱ्याचा सखा-सोबती, सुख-दुःखाचा साथीदार आणि वर्षभर धन्यासाठी राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बैलपोळा सण अकोट शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. खानापूर वेस परिसरात झालेल्या पोळा सोहळ्यात परिसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ता मुरलीधर तेलगोटे मित्र परिवारातर्फे कृषिनिष्ठ शेतकरी राधेश्याम मर्दाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एकत्रितपणे बैलांची तसेच मानाच्या बैलजोडीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पोळा फुटला. पुढे घरोघरी बैलजोडीचे औक्षण व पूजन करून त्यांना गोड पुरणपोळी तसेच सुग्रास अन्नाचा नैवेद्य देण्यात आला.

मर्दाने परिवाराची अनेक दशकांची पोळा परंपरा

कृषिप्रधान संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या बैलपोळा सणाला शेतकरी समाजात विशेष महत्त्व आहे. कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून मर्दाने परिवाराकडून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याची अनेक दशकांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.
पोळ्यानिमित्त मर्दाने परिवाराच्या बैलजोडीचा विशेष साजशृंगार करण्यात आला होता. बैलांच्या पाठीवर नक्षीकाम, अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्यावर बाशिंगे, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवीन वेसण व कासरा अशा पारंपरिक पद्धतीने बैलजोडी सजविण्यात आली होती.
कृषिनिष्ठ शेतकरी तथा ज्येष्ठ कामगार नेते राधेश्याम मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकी नगर येथून सजविलेल्या बैलजोडीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. राधेश्याम मर्दाने यांच्या डोक्यावरचा फेटा आणि अंगावरील नवीन पोशाख लक्षवेधी ठरला.वाजंत्री, सनई, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक वाल्मिकी नगर येथून निघाली. शनिवारपुरा मार्गे अण्णाभाऊ साठे नगर येथील मारुती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कालिका चौकातील कालंकामातेची पूजा करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर मिरवणूक खानापूर वेस येथील बैलपोळा उत्सवस्थळी पोहोचली.
या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते भरतराज मर्दाने, राजे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष चेतन मर्दाने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मर्दाने, अरविंद मर्दाने, गोविंद मर्दाने, गौरव मर्दाने, बाबा सारसर,किच्चा ब्राह्मणकर ,संतोष चावरे, निलेश चावरे,पृथ्वी मर्दाने, गणू धामुनिया, रितू मर्दाने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलांच्या साजशृंगाराने, ढोल-ताशांच्या गजराने आणि पारंपरिक उत्साहाने खानापूर वेस परिसरात दिवसभर पोळ्याचा उत्साह अनुभवायला मिळाला.