Home Breaking News ब्लास्टिंगची तातडीने चौकशी करून प्रमाण कमी करा : घरांना तडे, मालमत्ता व...

ब्लास्टिंगची तातडीने चौकशी करून प्रमाण कमी करा : घरांना तडे, मालमत्ता व पिकांचे नुकसान; प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी : छोटूभाईंची मागणी*

13

 

By ::*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : वरोरा शहर तसेच ग्रामीण भागालगतच्या कोळसा खाणी परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लास्टिंगच्या कंपनांमुळे घरांना तडे जाणे, घरगुती साहित्याचे नुकसान होणे, तसेच शेतजमीन, पिके व इतर मालमत्तेचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ब्लास्टिंगचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम कमी करावेत, अशी मागणी माजी सभापती तथा असंगठित कामगार संघटना चंद्रपूर – गडचिरोली अध्यक्ष शेख जैरुदीन छोटूभाई यांनी केली. व त्याच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

*नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी*
निवेदनात वरोरा शहर व ग्रामीण भागाजवळ होणाऱ्या ब्लास्टिंगची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, ब्लास्टिंगमुळे घरांना, घरगुती साहित्याला, शेतजमिनी व पिकांना नुकसान झाल्याच्या तक्रारींचे अधिकृत पंचनामे करून पात्र नुकसानग्रस्तांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी,
मार्डा तसेच कोळसा खाण परिसरातील इतर गावांमध्ये झालेल्या नुकसानीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून नुकसानग्रस्तांची यादी तयार करावी, कंपनांचे वैज्ञानिक पद्धतीने मोजमापसह,ब्लास्टिंगसाठी लागू असलेले सुरक्षा नियम, परवानगीच्या अटी तसेच ग्राउंड व्हायब्रेशन नियंत्रणाचे निकष पाळले जात आहेत की नाही, याची सक्षम यंत्रणेमार्फत तपासणी करावी, प्रत्येक मोठ्या ब्लास्टिंगनंतर कंपनांचे अधिकृत पद्धतीने मोजमाप करून त्याचे रेकॉर्ड व अहवाल प्रशासनाकडे उपलब्ध ठेवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच ब्लास्टिंगमधून निर्माण होणारे फ्लाय-रॉक, धूळ, आवाज व कंपन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण व्यवस्थापनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, ब्लास्टिंगपूर्वी व नंतर पाहणीची मागणी
ब्लास्टिंगच्या परवानग्या, ब्लास्ट डिझाइन, वापरण्यात आलेले स्फोटक, ब्लास्टिंग रेकॉर्ड आणि व्हायब्रेशन मॉनिटरिंग अहवाल यांची सक्षम अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. तसेच ब्लास्टिंगपूर्वी व नंतर परिसरातील घरे, शाळा, धार्मिक स्थळे, संवेदनशील इमारती आणि सार्वजनिक मालमत्तेची पाहणी करून त्याची नोंद ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित खाण अधिकारी, कंपनी, कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

*लेखी आदेश व कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी*
नागरिकांच्या वारंवार तक्रारी व बैठका होऊनही केवळ तोंडी आश्वासने न देता प्रत्येक मागणीवर जबाबदार अधिकारी निश्चित करून कार्यवाहीची अंतिम तारीख जाहीर करावी. प्रशासन, खाण व्यवस्थापन व संबंधित सुरक्षा यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन ब्लास्टिंगचे प्रमाण, कंपन आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, भविष्यात ब्लास्टिंगमुळे जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्यास जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

*मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
वरील मागण्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करून ब्लास्टिंगचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम कमी करावेत. निर्धारित कालमर्यादेत कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहभागाने लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन तसेच मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेख जैरुदीन छोटूभाई यांनी दिला.
निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते दशरथ शेंडे, अशोक बावणे, मंगलाष्टक कुंभरे महाराज, संदीप वैद्य, मोहसीन भाई, आकाश यांच्यासह नागरिक व सहकारी उपस्थित होते.