मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अकोटमध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन; एसडीओंमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भरतराज मर्दाने
अकोट : निवडणूक प्रक्रिया तसेच मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या कथित अनियमिततेच्या आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोट येथे हे आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पुनरावलोकन (SIR) तसेच मतदार नोंदणी आणि मतदानातून नावे वगळण्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, या सर्व बाबींची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकार तसेच संबंधित निवडणूक यंत्रणेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘ज्ञानेश कुमार इस्तीफा दो, इस्तीफा दो’ अशा घोषणा देण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला.
आंदोलनानंतर अकोटच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांच्या प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता तसेच मतदार नोंदणी व मतदानातून नावे वगळण्यासंदर्भातील निर्णयांची न्यायालयीन अथवा स्वतंत्र चौकशी करावी, लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंका व आक्षेपांवर पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे, तसेच प्रत्येक मतदाराचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभा पक्षनेते अधिवक्ता महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रशांत पाचडे आणि अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सारंग मालानी, गजानन डाफे, काँग्रेस नेते मुकुंद पांडे, नगरसेवक बादल अहिर, विकास देशमुख, नगरसेवक अजहर शेख, नगरसेवक शेख ख्वाजा, नगरसेवक परवेज भाई, विशाल भगत आणि नगरसेवक अचल बेलसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेस विधानसभा तालुकाध्यक्ष निलेश आग्रे, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष रोशन चिंचोलकर, विवेक गणोरकार, राजू ढोले, सुभाष मोहिते, शाकीर भाई, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नुसरत अली, अनुसूचित जाती शहराध्यक्ष सागर तेलगोटे, नितीन तेलगोटे, आकाश तेलगोटे, अभय तेलगोटे, अनिल फूलंबरकर, प्रशिक डोंगरे, मोंटी तेलगोटे, किशोर बोंद्रे, सुदीप करवंदे, रोशन धांडे, नागोराव केदार, पंकज ठाकरे, वैभव पाचडे, राजेश साकोम, रमजान शहा, हसन शहा, अथर हुसेन, अब्दुल मुबारक, केशव हेड, विशाल राठोड, आशिष वानखडे, निखिल वानखडे, विवेक सरदार, प्रतीक सरदार, दीपराज खंडारे, हैदर अली, सोमनाथ हिंगे, केशव लांडे, बाळू भाऊ भास्कर, पवन नाथे, आदित्य मिरकूटे, सै. जमीन मोहम्मद वाजिद अली, कैफ अली, शेख अरबाज, उझेफ शाह, अब्दुल अबुजर, शेख फरहान जावेद अली आणि आजम इनामदार यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









